तयास मानव म्हणावे का?


ज्ञान नाही विद्या नाही 
ते घेणेची गोडी नाही 
बुद्धी असूनि चालत नाही 
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही 
पशुही ऐसे बोलत नाही 
विचार ना आचार नाही 
तयास मानव म्हणावे का? 

पोरे घरात कमी नाहीत 
तयांच्या खाण्यासाठीही 
ना करी तो उद्योग काही 
तयास मानव म्हणावे का?

सहानभूती मिळत नाही 
मदत न मिळे कोणाचीही 
परवा ना करे कशाचीही 
तयास मानव म्हणावे का?

दुसऱ्यास मदत नाही 
सेवा त्याग दया माया नाही 
जयापाशी सद्गुण नाही 
तयास मानव म्हणावे का? 

ज्योतिष रहल समुद्रकही
स्वर्ग नारकाच्या कल्पनाही 
पाशुत नाही तो जो पाही 
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करत राही
ऐतोबा तो खात राही 
पशू पक्षात ऐसे नाही 
तयास मानव म्हणावे का?

पशू पक्षी माणूसही 
जन्म मृत्यु सर्वांनाही 
यांचे ज्ञान जराही नाही 
तयास मानव म्हणावे का?

~ सावित्री बाई फुले, काव्यफुले (१८५४)