Monday, May 9, 2016

दुष्काळाशी संवाद साधतांना: भाग दूसरा: लातूर ते पुणे सायकल प्रवास

दुष्काळाची ओळख करण्याच्याआणि समजून घेण्याच्या इच्छेतुन या प्रवासाची तयारी आम्ही केली. पुण्यात शिक्षण घेणारे समवयस्क मित्र वैभव, संतोष, सागर आणि मी ज्ञानेश्वर असे आम्ही सोबत हा प्रवास केला. सायकल चालवण्याचा अनुभव भन्नाट तर होताच मात्र त्याहिपेक्षा भन्नाट आहे येथील परिस्थिती. जी प्रवासवर्णनातून मांडण्याचा हा मिश्किल प्रयत्न.


४ दिवस, ४० तास, ४ सायकली, ४ मित्र आणि ४०० पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास, जो आम्ही ४ जिल्हे, ८ तालुके, आणि ५० पेक्षा जास्त गावातून केला. या प्रवसाची काही वैशिष्टये अशी की पूर्ण प्रवासात कुठे चांगल्या ठिकाणी रूम घेऊन न थांबणे, दुपार आणि रात्रीच्या विश्रांतीच्या वेळात लोकांशी संवाद साधणे, प्रवासाच्या आनंदासोबतच काहीतरी संदेश लोकांना देणे; जसे की 'ह्या दुष्काळाला कारणीभूत निसर्गापेक्ष्या माणूस जास्त आहे' तसेच पाणी आडवा-पाणी जिरवा, पाणी थांबवा-पाणी जिरवा इत्यादी. आमचा पहिला, लांबचा आणि उन्हातला प्रवास असल्यामुळे जास्त लोकांशी भेट होने जरी शक्य झाले नसले तरी रस्त्यावर भेटलेली लोक, आजुबाजूच्या परिस्तिथीचे निरिक्षण, काही लोकांच्या बोलण्यातील संदर्भाच्या आकलनातून हे प्रवासवर्णन लिहले आहे.


Latur to Solapur Highway

२९ एप्रिल २०१६


सकाळी ५:४५ च्या सुमारास सोनावती ता. जि. लातूर या गावातून आम्ही निघालो. सोनावती - बाभळगाव - शिवाजी चौक - लातूर - हरंगुळ असा प्रवास करून आम्ही दुपारी मरुडमधे थांबलो. या प्रवासात आम्ही बाभळगाव ह्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गावाची तोंडओळख केली. या आधीच आम्ही या गावास भेट दिली होती. येथील पाणीप्रश्न मिरजच्या रेल्वेमार्फत होणाऱ्या पिण्याच्या पाणी पुरवठयाने जरी तात्पुरता टळला असला तरी तेथील शेतीची परिस्थिती इतर गावांप्रमाणेच दिसली. भुजलाच्या प्रमाणात झालेल्या कमीचा अंदाज बांधता आला. तो यापुढिल पूर्ण लातूर जिल्ह्याचा परिसरात कमीअधिक प्रमाणात सारखाच दिसला. पुढे लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या थोडयाश्या अंतरावर असणाऱ्या एका पाणीपंपावर प्रत्यक्षात हंडयांची रांग बघितली जी खुप सकाळीपासूनच लावून ठेवली होती मात्र पाणी अजूनही आलेले नाहीं अशी माहिती मिळाली. 

दुपाराच्या जेवणाची सोय आम्ही एका लग्नात जावून केली. तेथील संयोजकांनी आमचे कौतुक केले आणि आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. पुढील प्रवास काहीसा लातूर जिल्ह्यातील मुरुडपासून - ढोकी - येडशी - रामलिंग - ढेंवरेवाडी ते चिंचोलीच्या तुळजाभवानी ढाब्या पर्यन्तचा झाला. या दिवसाच्या प्रवासात आम्ही महत्वाचे ठिकाण पाहिलित ज्यांचे संबंध दुष्काळाशी तर आहेतच मात्र लोकांच्या दृष्टीने त्यांचे महत्व काहीसे रोजगाराचे साधन, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, प्रतिष्ठेचे ठिकाण असे असल्याने दुष्काळ हा विषय तेथील लोकांच्या मांनसिकतेतून वळलेला दिसतो. 


Scarcity of Drinking-Water 


लातूर शहर हे औद्योगिक शहर मानावे एवढया तरी कारखान्यांची संख्या आम्हाला शहराबाहेर येतांना दिसली. म्हणजे हरंगुळ या गावापर्यंत त्यांची व्याप्ती आहे. येतांना मांजरा सहकारी साखर कारखाना देखील बघायला मिळाला. येथील पाण्याच्या वापराची आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती सकाळची वेळ असल्या कारणाने उपलब्ध होऊ शकली नाही. लातूर येथील निरीक्षणाच्या अनुषंगाने असे सांगता येईल की येथील दुष्काळ हा मानवनिर्मित तर आहेच मात्र त्याची मूळ ही येथील व्यवस्थेच्या हितसंबंधात आणि त्यांच्या अपारदर्शी व्यवहारामधे आहेत. उदा. सोनावती गावातील ग्रामपंचायतीमधे पाणी प्रश्नांवर सर्व गटांच्या एकमताने चर्चा जरी झाल्या असल्या तरी उपाययोजनेत एकमत आणि सामुहिक विश्वास दिसला नाही. कारण यमुना मिशन, स्वराज अभियान आणि ग्रामपंचायत सोनावती यांची वेगवेगळी कामे चालू होती. तरीही कामांमधली दूरदृष्टि आणि आपत्ती निवारणाचा हेतु ह्या सगळ्यात सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून जर अंमलात आणला गेला तर येथील दुष्काळ हा तात्कालीन ठरू शकतो पण हे करण्याची मानसिक तयारी महत्वाची.

३० एप्रिल २०१६


रात्रीच आम्ही लातूर सोडून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला होता. नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित सीमा बघुन ओढवत नाही तर तिचा परिणाम त्या आसपासच्या सर्वच घटकांवर आपोआप होतो. या जिल्ह्यात दुष्काळची तीव्रता कमी तरी रस्त्याच्या दूतर्फा पाणी व्यवस्थापनाचे उपक्रम चालू होते हे विशेष. अर्थात ते फ़क्त आमच्या रस्त्यावरील बघण्याच्या नजरेतच आढळले. वेळेअभावी आतील भागाची सैर झाली नाही. नाल्यातील गाळ काढणे, खोली-रुंदी वाढवण्यासारखी कामे येथे चालू होती. ३० किलोमीटरपेक्षा कमी  अंतरीचा प्रवास असल्याने या जिल्ह्याचे जास्त कामे बघता आली नाहीत. तरीही रस्त्याने येतांना काही माकडे रस्त्यावर आलेली दिसली जी रस्त्यावरील मुसाफिरांकडे जणू आशेने बघत होती. मुळात जंगलांचे आणि त्यानंतर तेथील जैवविविधतेचे अस्तित्वच नष्ट झाल्याने ती आज आपल्यावर अवलंबुन जगताहेत. गाड्यांमधून बिस्किटे, वेफर्स, फळांच्या साली असे निकृष्ठ अन्न त्यांच्या वाटेला येते. 

सकाळी आम्ही जास्त प्रवास करण्याचे ठरवले असल्याने ८.३० वाजेपर्यंत बार्शी मधे पोहचलो. बार्शी हे सोलापूर जिल्यातील विकसित शहर मानले जाते. सोलापूर जिल्ह्यात आमचे स्वागत केळीच्या मळयांनी केले. तसेच बार्शीचे औद्योगिक विकसित क्षेत्र देखील बाहेरून चांगले दिसले. नाश्ता करून आम्ही परांडासाठी निघालो. पण तेथील परिसर कोरडाच होता. उलट जंगलाचा मोकळा प्रदेश जरी असला तरी झाडांची संख्या नगण्यच होती. आणि कापलेली खोड देखील दिसत होती. उस्मानाबादचा आकार चंद्राच्या कोरीसारखा वळलेला असल्याने आम्हाला परत २०-२५ किलोमीटर हा जिल्हा फिरायला मिळाला. परांडामधील दुपारच्या विश्रांतीनंतर आम्ही जेउर साठी निघालो. सालसे आणि साडे यासारखी गावे बघत संध्याकाळपर्यन्त जेउर आणि नंतर जेउरवाडी मधे थांबलो. ह्या प्रवासात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही १०० पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला व त्याचासोबत जिल्हयाजिल्ह्यामधील प्रादेशिक बदलाची खुप जवळून ओळख झाली. 

परांडा ते जेउर भागात एक वेगळा उपक्रम बघायला मिळाला तो म्हणजे येथील प्रत्येक शेतीच्या उताराच्या दिशेच्या बाधांजवळ २×२ फुट पेक्षा जास्त लांबी-रुंदीचे नाले तयार केलेली होती. जेनेकरुन पाणी वाहून न जाता ते जमिनीत जिरेल. या कामाची अंमलबजावणीही मोठया प्रमाणावर झालेली दिसली. हा भाग सीना नदीचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. तेथील पाणी अडवण्यासाठी सीना-काळेगाव धरण बांधलेले आहे. आज हा जलाशय पूर्णपणे कोरडा झालेला आहे. येथील पिकपद्धतितील दोषांसोबतच लोकांचा अतिहस्तक्षेप हा बिकट परिस्थितीचे स्वागतच करतांना दिसतो. येथे उस लागवड करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी धरण आणि नदीच्या पात्रात उस पिकासाठी बोअरवेल खोदून पाण्याचा उपसा केलेला दिसतो. यामधील कायद्याचे उल्लंघन आणि कायद्यांची मर्यादा, त्यांची पारदर्शक अंमलबजावणी आणि लोकांच्या निष्काळजीपणा यांचे सुस्पष्ट दर्शन घडते. 

जेउर हे तसे आता नावारूपास आलेले गाव आहे. करमाळा तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे असलेले गाव म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. उच्चशिक्षणाची सोय, साप्ताहिक बाजार आणि प्राथमिक सोबतच द्वितीय आर्थिक क्रियाही चालत असल्याने या गावाचे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे. आजची या गावाची नवी ओळख म्हणजे पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट अश्या वास्तवदर्शी गावगाडा मांडणाऱ्या चित्रपटांचे दिरदर्शक नागराज मंजुळे यांचं हे गाव. आम्ही मित्रांपैकीच संतोषचे घरही इथेच असल्याने आम्ही तिथेच थांबलो. 


०१ मे २०१६


आजच्या प्रवासाची सुरुवात सुखावणारी होती कारण सकाळीच दुध पिण्यास मिळाल्याने, तेहि आईच्या हातुन. असे प्रसंग वेगळाच उत्साह निर्माण करतात. मागील दोन दिवसातील अनुभवांनी ह्या क्षणाला महत्व देखील मिळवून दिले होते. संतोषच्या आई-वडिलांना आम्ही करत असलेल्या कामाचा खुप काळजीवजा आनंदही झाला. आजचा प्रवास जेउर - पोपळज - मांजरगाव - पारेवाडी - केत्तुर - लोणी दुपारनंतर हायवेवरिल गाव ज्यात भिगवण - रावणगाव असा होता. भिमा नदीच्या खोऱ्यातील या प्रदेशाला दुष्काळाची झळ जरी प्रत्यक्षात लागत नसली तरी त्याची पूर्वस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झालेली दिसते. 

ह्या प्रदेशातील प्रवासाची विशेषता म्हणजे येथील रस्ते; एकटे, खुप मोठया चढ - उतारांचे पण खुप बोलके. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला केळी, उस आणि फुलमळेही जसे सजवुन लावलेली होती. या हिरवळीची नाळ जुळली आहे येथील धरणाशी. महाराष्ट्रातील नंबर तीनचा सर्वात मोठा आणि खुप मोठे क्षेत्र व्यापलेला भिमा नादिवरील 'उजनी प्रकल्प' येथेच आहे. याचा फ़ायदा तर कष्टकरी शेतकऱ्यांना होतोच मात्र पाण्याचे दिवसेंदिवस होणारे कमी प्रमाण ही येथील चिंतेची बाब बनली आहे. मागील काही वर्षापेक्षा आजची पाण्याची स्थिती बरोबरच लागवडीचे प्रमाणात देखील फरक आढळतो. 

शेतीला पोहचणाऱ्या पाण्याची शुद्धता, क्षारयुक्त घटकांची तपासणी होणे देखील आवश्यक वाटते. धार्मिक तसेच औद्योगिक ठिकाणी केले जाणारे प्रदूषण शेतकऱ्याच्याही वाटयाला येतेच. आम्ही एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबलो तेथे दोन वेगवेगळी पंप चालू होती. एक नदितुन आणि एक विहिरितुन येणाऱ्या पाण्याचा होता. ज्याची रुंदी लहान-मोठी होती आणि मोठया पाइपमधुन येणाऱ्या पाण्याची प्रत ही लोकांसाठी तर नाहिच मात्र प्राण्यासाठीही वापरण्या योग्य नव्हती. शेतीला हेच पाणी दिल जाते. परिणामी कॅन्सर सारखा आजार निर्व्यसनी माणसालालाही होण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून नुसती सहानुभूतिपूर्वक देणगी देण्याबरोबरच जर मूळ घटकांचा विचार करुन उद्योगपतींनी त्यांच्या औद्योगिक सांडपाण्याचे नीट व्यवस्थापन केले आणि सामान्य माणसाने आपल्या धार्मिक भावनांची चिकित्सा करून राज्यसंस्थेला भानावर आणले तर मूळ परिस्थिती बदलेल आणि तीच खरी सामाजिक सेवा असु शकते. 

पारेवाडी नंतर आम्ही प्रत्यक्ष उजनी धरण बघितले. आमची पोहण्याची इच्छा तिथे पोहचेपर्यंत मावळली. कारण सांगितले तर वरुण देवताचा कोप होईल असे वाटते! सर्वसामान्य लोकांच्याही मानसिकतेत फरक हा संसाधनाची कमी आणि अतिरेकचा प्रभावातुन दिसतो किंवा पाण्याची टंचाई नसल्याने जाणिवा बोथट झाल्या असतील. पाणी बचतीबद्दल काही लोकांची मते ही 'आम्हाला काही गरजच नाही, आम्ही वाटेल तस पाणी वापरतो' त्याचबरोबर 'तुम्ही विद्यार्थी एवढया दूर कश्याला आलात ? बांधकाम करणारे कामगार आहात का ?' अशी ऐकायला मिळाली. आम्ही पुण्यात शिकणारे विद्यार्थी आहोत ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अर्थातच आमचे कौतुक करून उत्साह वाढवणारी लोकही भेटलीच, काहिनीं तर घरी येण्याचा आग्रहदेखील केला. 

बोटीतून धरणाच्या पाण्यात बघतांना जुन्या संस्कृतीचे अवशेष सापडावे तसे मुळा-मुठा नदितले अवशेष बघायला मिळाले. पाण्याच्या रंगासोबतच गंधातील बदलाचे कारण शोधतच दूसरा किनारा आला. सगळीच कारणे पूर्णपणे मानवनिर्मित आहेत. आपल्या जगण्यातला अतिरिक्त चंगळवाद हे ह्या सर्व विनाशाचे मूळ आहे ह्यासंबंधी प्रबोधनाची गरज तर आहेच पण कायद्याचे निंयत्रण निर्माण करणेही तेवढेच महत्वपूर्ण ठरेल. लोणी नंतरचा प्रवास हायवेवरून करायचे आम्ही ठरवले. 
  
यापुढिल पुण्यापर्यंतचा आमचा पूर्ण प्रवास राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ९ वर झाला. सरळ-सोपा रस्ता हे जरी त्याचे प्राथमिक कारण असले तरी गावातील छोट्यामोठया रस्त्यांच्या निरीक्षणासोबतच आम्हाला हायवेच्या आजुबाजूची परिस्थिती, वाढते औद्योगीकरण, नाजिकच्या गावातील विकासकामे आणि दळणवळणाच्या सोयींचा प्रभाव सुपिक-नापिक जमिनीवर कसा पडतो हे बघायला मिळू शकेल असा तर्क आम्ही लावला.

०२ मे २०१६

लोणी ते भिगवण ह्या प्रदेशात केलेला प्रवास हा काहिसा आत्मविश्वास वाढवणारा ठरला. कारण मागील दोन दिवसात आम्ही केलेल्या प्रवासाच्या गप्पा आणि जवळ येणारे पुणे शहर आमचा उत्साह वाढवत होते. निरीक्षणात आलेल्या गोष्टींमधे उजव्या बाजूला दूर अस्पष्ट असे उजनी धरण आले . भिगवण नंतर त्याची सीमा संपते. रस्त्याच्या कडेला असलेल्या गावांचा विकास हा रस्तापुरताच मर्यादित असलेला दिसला. औद्योगिकिकरणाचा विकास वाहतुकीच्या अनुकुलतेमुळे झालेला असला मात्र त्याचा आणि गावतल्या लोकांचा कितपत संबंध येतो, याबद्दल माहिती उपलब्द होऊ शकली नाही.

Ramling Forest Site, Yedasi


०३ मे २०१६

रावणगाव मधून सकाळी ५:३० लाच प्रवासाला सुरुवात केला. येथून पुणे ९० किलोमीटर एवढे आहे. रस्त्यात येणाऱ्या कुरकुंभ, पाटस, यवत ही गाव लागली. तेथील परिस्थितीत याआधीच्या परिस्थितिपेक्षा जास्त बदल नाही जाणवला. दुष्काळग्रस्त भाग असे ह्या भागाला म्हणता येत नाही कारण येथे असणारी दळणवळणाची सुविधा! पण फक्त पाणी नसणे म्हणजेच दुष्काळ नाही तर उपलब्ध पाण्याचा अमर्याद वापर करणे, अपव्यय करणे ही देखील येवू घातलेल्या दुष्काळाची पूर्वलक्षण आहेत. यापुढे शेतकर्यांपेक्षा दुकानदारांना भेटतो आहोत असे वाटले. पाणी प्रश्न बोअरवेलने जमिनीचे रक्त शोषुन शोषून सोडवण्याची सर्रास प्रथा येथे आढळली. ह्या चंगळवादाला विरोध करण्यासाठी राजकीय आणि नैतिक उदासीनता संपवणे गरजेचे आहे. अतिरिक्त पाण्याची उपलब्धता हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे पाणीसाक्षर होणे याबद्दलची जाणीव येथील लोकांमधे निर्माण होण्याची गरज आहे असे जाणवले. 

दुपारी आम्ही उरळी नजीकच एका ठिकाणी सावली बघुन थांबलो. जेथे एक बाबा आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला चटई, पाणी आणि नंतर सरबत देखील दिले. त्यांच्याशी श्रद्धा अंधश्रद्धेविषयी दुपारी गप्पा झाल्या आणि ३:३० नंतर पुण्याकडे निघालो. ह्या भागात बागायत शेती मोठया प्रमाणात केली जाते. खडकवासला, उजनी धरणातील पाण्याची शेतीसाठी कालव्यान्द्वारे उपलब्धता केली जाते. आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे येथील शेतीच्या विकास झालेला दिसतो. येतांना हडपसर येथील द्राक्ष अनुसंधान केंद्र बाहेरुनच बघायला मिळाले. 

अचानक गर्दीत घुसल्यासारख वाटत आम्ही पुण्यात प्रवेश केला. संध्याकाळी ६.२० च्या सुमारास आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, शिवाजी नगर येथे आमच्या रहिवासी ठिकाणी पोहचलो. चार दिवसांच्या शारीरिक वेदनांपेक्षा आम्हाला केलेल्या कामाचा अभिमान आणि ते पूर्ण होण्याचा स्वाभिमान वाटत शहारल्या सारख तर झालच होत मात्र आम्ही केलेल्या समस्यांची प्राथमिक ओळख करून घेतल्यानंतर त्यांची अधिक प्रस्तुत आणि प्रमाणित माहिती मिळवण्याच्या जवाबदारीची जाणिवही झाली. हे लिखाण ही त्याची पहिली पायरी होती असे समजले तरी चालेल. 

दुष्काळ हा खर तर मानवनिर्मित पेक्षा सामाजनिर्मित असतो असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण दुष्काळ हा एका किंवा काही लोकांमुळे निर्माण झालेली आपत्ती नसते तर तिला कारणीभूत सर्व समाजव्यवस्था असते. आणि तिच्यावर मात करणं हे काही एका व्यक्तीच्या आवाक्यात येणारी गोष्ट नाही. तिला एक सामूहिक किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून बघितले पाहिजे.

 

समाजात वाढती जातीयता, अंधश्रधा, सामाजिक-धार्मिक तेढ याचबरोबर लोकांची वाढत गेलेली उदासीनता ज्याची मूळ देखील समाजरचनेतच आहेत हे देखील समस्यांना आदर्श परिस्थिती निर्माण करून देणारी कारण आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा तर आहेच मात्र त्याच्या संवेदना ह्या राज्यव्यवस्थेने जाणून घेतल्या पाहिजे. मोठया परिमाणात बदल राज्यव्यवस्था करू शकते. सामूहिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या आयुष्यात किती कमी आणि गरजेपुरताच पाण्याचा वापर करू शकतो यावर छोटे छोटे प्रयोग करून देखील एकमेकांना सांगितले तरी ह्या परिस्थितीचे निवारण करने सहज शक्य आहे. आपण सर्वजण मिळून ह्या संकटावर मात नक्कीच करू शकू.


~ ज्ञानेश

----- 


Thursday, May 5, 2016

दुष्काळाशी संवाद साधतांना: भाग पहिला: श्रमदान शिबिर

प्रस्तुत लेख हा आम्ही तीन मित्रांनी  संतोष, सागर आणि  ज्ञानेश्वर २२ एप्रिल ते २८ एप्रिल २०१६ दरम्यान लातूर जिल्ह्यातील सोनावती गावात झालेल्या श्रमसंस्कार शिबिराची व त्याजवळील दुष्काळाची दृश स्वरूपात मांडणी  करण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचसोबत पुढील ४ दिवसांचा लातूर ते पुणे सायकलीने केलेला प्रवास, ज्यात वैभव, हा चौथा मित्रही जोडला गेला, त्या प्रवासाचे वर्णनही ह्या लेखामध्ये लिहलेला आहे.
Sonawati Dam during the Rainy Season

 

-----

दुष्काळ, ज्याला वेगवेगळी नाव दिली जातात. प्रत्येकजण आपल्या मानसिक अभिक्षमतेचा कस लावून त्याला आपल्या व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न करतो. काही म्हणतात की, दुष्काळ म्हणजे निसर्गाचा कोप; तर काही म्हणतात मानवाने स्वतः ओडवुन घेतलेल नैसर्गिक संकट. दोन्हीही मतांची व्याप्ती तपासत, नुसती त्याची वरवर चर्चा करणं. शहरात, सकाळी संडासाचा फ्लश, मोरीतला शौवर आणि नंतर वाटरपार्कमध्ये खिदाखिदा आनंद घेऊन तोंडावर पडत गंभीर; निरर्थक चर्चा करनं. एवढ्यापुरंत मर्यादित राहण्यापेक्षा, प्रत्यक्ष त्या प्रदेशात जाऊन काही रचनात्मक काम करु. काही दिवस गमती जमातीचा प्रवास करुन लोकांची मते, भूमिका, जाणिवा, संवेदना जाणून घेवू या उद्देशाने आम्ही २२ एप्रिल २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील सोनावती गाव या ठिकाणी जाण्याचे ठरवलं. 

सोनावती गावामध्ये आमची ओळख 'स्वराज अभियान' या संघटनेसोबत झाली.  मागील काही वर्षांपासून स्वराज अभियान सोनावती आणि आसपासच्या काही गावांमध्ये "पाणी वाचवा, पाणी जिरवा" सारख्या कार्यक्रमांनी जनजागृती करत आहे. याविषयी अधिक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये मिळू शकेल. आम्हाला या संघटनेतील लोकांशी बोलून आणि काम करत असताना नवनवीन गोष्टी कळल्या. संघटनेच्या मते, शेतकऱ्याचे ज्या काही  सामाजिक-राजकीय -सरंजांमदार आणि भांडवलदार वर्गाने शोषण केले आहे. त्या शोषणाची आवश्यक ती खरी परतफेड एकच ठरू शकते, ती म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून स्वतः राजकीय सहभाग घ्यावा व आपली भूमिका शासन व्यवस्थेला पटवुन द्यावी. स्वतःसाठीचा न्याय स्वतःच मिळवून घ्यावा. राजकीय अविश्वासातून निर्माण झालेली अपरिहार्यता का होईना पण ही आजची एक मूलभूत गरजही बनली आहे. खूप चर्चा झाल्या. चळवाळीचा पाया जर खरा, पारदर्शक, शाश्वत आणि पुरोगामी असला तर तिचे अस्तित्व टिकणे शाश्वत आहे, असा निष्कर्ष शिबिराच्या चर्चांमध्ये काढला गेला . 

आजच्या शेतीसाठी सगळ्यात महत्वाच म्हणून संदीपान बडगिरे एक शेतकरी कार्यकर्ते बोलले की,
"लोकांनी सेंद्रिय शेती करण्यात रस घेतला पाहिजे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून पाण्याचे काटेकोर आणि योग्य उपाययोजन केले पाहिजे. उस, कापूस, मका सारखे अतिपाणी खर्चीक पिक न घेता; ज्वारी, बाजारी, कडधान्या सारख्या कमी पाणी लागणाऱ्या आणि प्रत्यक्ष घरात उपभोगीय असणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे."
दिनांक २३ एप्रिल ते २८ एप्रिल अशी पाच दिवस हे साहसी श्रमसंस्कार शिबिर चाललं. ज्यामधे आम्ही मित्र गावकऱ्यांसोबत सहभागी झालो. ५ दिवसांमधे आम्ही सरासरी १५ ते २० लोकांनी मिळून १५×३ फुट लांबी×रुंदीचे दोन बंधारे गाव शेजारील नाल्यावर बांधले.
-----

'दुष्काळ' या आपत्तीचं वेगळेपण हे आहे की ह्या आपत्तीची चाहुल खुप आधीच लागून जाते. ती पूर, भूकंप इत्यादी आपत्तीसारखी अचानक येत नाही. म्हणून त्यावर उपाययोजना देखील अधिक परिणामकारकपणे केली जावू शकते. कारण इतर आपत्तींपेक्षा यामधे वेळ खुप जास्त मिळतो. मात्र आपल्या राजकीय व्यवस्थेचा (प्रतिनिधींचा) रस हा भांडवली जगामधे जास्त गुंतला असल्या कारणाने त्यांचे दुष्काळाकड़े दुर्लक्ष्य होतांना दिसते. म्हणजे जरी महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये (बुंदेलखंड प्रांत) दुष्काळजन्य परिस्तिथी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे; हे ऑगस्ट २०१५ मध्येच सिध्द झाले असले तरी त्याच्या उपाययोजनेवर चर्चा आयपीएल सारख्या मुद्द्यानंतर म्हणजे मार्च २०१६ पासून प्रसारमाध्यामात झळकायला सुरुवात होते ही खरी शोकांतिका आहे. 

लातूर मधल्या अतितीव्र दुष्काळी भागाचीही हीच परिस्थिती आहे. म्हणजे मागील तीन महिन्यांपर्यन्त विविध बडे औद्योगिक आणि साखर कारखाने चालु होते. ज्याची नाळ ही राजकारण आणि अर्थकारणाशी जुळलेली आहेत. तीच राजकारणी माणसे आता दुष्काळी भागात विकासाच्या कामांची आश्वासन देत आहेत. याचा फ़ायदा कोणाला आणि कश्या पद्धतीने होईल याबद्दल अजूनही पारदर्शकता नसतांना 'उस लागवड हे दुष्काळाचे कारण नाही' असा दावा इथली सत्तास्थान मात्र करतांना दिसतात असा आशय मला या शिबिराचे आयोजक संदीपान बडगिरे व इतर शिबिरार्थिंशी केलेल्या चर्चेतून जाणवला. 

संदीपान बडगिरे हे तेथील स्थानिक शेतकरी आहेत. ३० पेक्षा जास्त वर्षे त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचा सेंद्रिय शेतीवर विशेष अभ्यास आहे. त्यांनी फक्त दुष्काळातील समस्यांची मांडणी न करता उपाययोजनांची कल्पना देखील दिली. त्यांच्या मते आजच्या दुष्काळाला योग्य पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घेतली जावी. शेतकऱ्यांना बजारपेठेच्या गुलामीतुन सुटका मिळवण्यासाठी नगदी पिकांऐवजी घरी ज्यांचा उपभोग रोजच्या वापरात करता येऊ शकतो उदा. तृणधान्य आणि कडधान्य आणि जी जास्त दिवस साठवुन ठेवता येऊ शकतात अशी पिके घेतली तर दुष्काळाला शेतकरी तोंड देवू शकतो आणि पूर्वस्थिती निर्मीतीस अनुकूलता निर्माण होण्यास मदत होऊ शकते. 

शिबिरातील श्रमदानाचे महत्व -


श्रमदान हे शक्तीसाधन असलेल्या माणसाने गरज असलेल्या माणसाच्या समस्या निवारणासाठी करायचे असते. दुष्काळातील शेतकऱ्यांना कश्या प्रकारे मदत करावी हा प्रत्येकाच्या जरी स्वयंनिर्णयाचा मुद्दा असला तरी त्याची उपयोजितता आणि शाश्वतता प्रत्येकाने नीट तपासली पाहिजे. एखादे रचनात्मक काम करणे ज्यातुन समस्येचे कमी क्षेत्रात पण शाश्वत निवारण होईल अश्या कामांमधे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होणे हाच तर शेतकऱ्यांच्या जखमांना परिणामकारक मलम असू शकतो. म्हणूनच कि काय शिबिरात सिमेंटचे बंधारे बांधणे हा मुख्य हेतु होता.

सोनावती गावाच्या बाजूला असलेल्या एका पठारावरुन एक नाला वाहत गावाच्या बाजूने येवून पुढे मांजरा नदीला मिळतो. मागच्या काही वर्षांपासून येथे ऊस लागवड मोठया प्रमाणात होत होती. त्याचा परिणाम हा तेथील जमिनीतल्या भुजलाचे प्रमाण कमी होण्यात झाला. शेतकऱ्यांच्या ५०० फुटांपेक्षा जास्त खोल असलेल्या कृत्रिम कुंपनालिका आता कोरडया पडलेल्या आहेत. म्हणजेच पूर्वी गावातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी ऊस लावत होते. मात्र आजच्या परिस्तिथीत तेथे अश्या शेतकऱ्यांचे प्रमाण हे हातातील बोटांच्या संख्येपेक्षा कमी झालेले आहे. म्हणून भुजलाची पातळी वाढावी यासाठी पाणी थांबवणे आणि त्याला जिरवणे, जेणे करून आधी पृथ्वीची तहान भागवणे ही प्राथमिक जबाबदारी म्हणून मानली गेली पाहिजे. 

वाहून जाणारे पाणी जमिनीत जीरल्यास त्याची साठवण पृथ्वीत चांगली राहु शकते. म्हणजे कमी पाऊस जरी झाला तरी पाणी जमिनीत साठून रहावे हा त्यामागील हेतु आहे . मात्र उपाय सुचवताना तेथील भौगोलिक वातावरणाचा अभ्यास, लोकसंमती आणि लोकसहभाग इत्यादी पूर्वतयारी असायला हवी. जी या शिबिरामधे पाळली गेली. अडवलेल्या पाण्याचा प्रत्यक्ष पंपाने वापर न करता पाणी केवळ जीरावण्यासच असू द्यावे यावर लोकांची सहमती घेतली गेली होती हे महत्वाचे. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रिय शेती करण्याचेही ठरवलेले आहे. ज्वारी, तुर सारख्या पिकांची लागवड केल्याने पाण्याची बचत होईल आणि शास्त्रीय पद्धतीने जर सेंद्रिय शेती केली तर कमी खर्चात जास्त आणि उपयोगी, आरोग्यदायी अन्नपदार्थ उत्पादित होतील असा यमागचा उद्देश्य आहे . 

शेतकऱ्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्काची मागणी येथील स्वराज अभियान वेळोवेळी करते. ज्यामधे गावातील १४ शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सदस्य म्हणून सहभाग आहे. श्रमदानाची वेळ रोज किमान ५-६ तास होती. त्याचसोबत दररोज दुपारनंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. शिबिरार्थिंचे श्रमाविषयीची जाणीव सोबतच सामाजिक भानही वाढ़ावे म्हणून समकालीन परिस्थितिशी संबंधित विषयांवर संवाद होत होते . त्यातही महत्वाचे म्हणजे अंधश्रद्धा आणि बुवाबाजी, स्त्री-पुरुष समानता, पाणी प्रश्न, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, धर्माचे राजकारण, राष्ट्र्वाद अश्या विषयांवर वैचारिक चर्चा झडत होत्या.

सर्व चर्चा विवेकवादाच्या कसोटीवरच होत होत्या, म्हणजे स्त्री म्हणजे फक्त प्रजोत्पादन करणारे मशिन नसून तिही माणूस या प्रजातीमध्येच मोडते. तिच्यावरिल अन्यायाची सुरुवात स्त्रीभ्रूण हत्येपासून ते तिच्या अस्तित्वाच्या ओळखीपर्यंत देखील संपतांना दिसत नाही. आधुनिकतेच्या मानवतावादात स्त्रीचे स्थान कुठे असावे याचे समाजाकडून उत्तर मागण्याची सुरवात झाली पाहिजे. 

पाणी ही नैसार्गिक संपती आहे आणि त्याच्या वापरात कुठलाही दोष आढळत असेल तर तो मुलभुत/नैसर्गिक हक्काच्या भंगाएवढ़ाच दंडनीय आहे. असंघटित कामगारांची घुसमट आणि वाढता फसिस्टवाद या प्रश्नांची तीव्रता या चर्चामधुन कळाली. विशेष म्हणजे या चर्चेला गावातील लोक आणि शिबिरार्थी अशे सगळे बसतात, यामधे एखाद्या संकल्पनेला अधिक सोपे करूण सांगण्याचे कौशल्य शिकायला मिळाले. 

दुपारी शिबिराच्या समारोपात अनेकांनी आपले विचार मांडले. ज्यामधे प्रत्येकाचा सांगण्याचा कल हा दुष्काळाच्या परिस्थितीशी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, व्यावहारिक, आणि नैतिक उपाययोजनांच्या आधारे कसे लढता येऊ शकते यावर होता. संस्थात्मक पातळीवर प्रयत्न तर असावेत तेहि जास्तीत जास्त पारदर्शकच पण त्याने मोठे ध्येय साध्य होत नाही. म्हणून त्याच्यासोबतच लोकांचा रचनात्मक कामात श्रमाच्या रुपात सहभाग आणि राजकीय सहभाग देखील तेवढाच महत्वाचा आहे असे संबोधित झाले.

दुष्काळ देखील जात, धर्म, वर्ग यानुसार वेगवेगळया परिमाणांतून पडताळता येऊ शकतो. म्हणजेच पाण्याचे टॅंकर हे देखील गावकुसातल्या वस्तीचे स्वरुप बघुन फिरतात. मुळात संसाधानांची मालकी आणि सामजिक प्रतिष्ठा दुष्काळाच्या तिव्रतेचे जास्त शोषित-केंद्रित घटक कोण आहेत ते ठरवतात. म्हणजेच प्रतिष्ठीत घटकांना दुष्काळाची झळ इतर बहुसंख्याकांपेक्षा कमी बसते. नदी, विहिरि, सार्वजनिक पाणवठे आटले तर पाणी विकत घेण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात आणि रोजगाराची अडचण हे आजचे वास्तव आहे. म्हणून दुष्काळावर उपाय हा सर्वांगाने विचार करुन केला गेला तरच ह्या संकटावर मात केलेली शाश्वत समजली जाऊ शकते.


Sonawati Dam during the Rainy Season

~ ज्ञानेश