प्रस्तुत लेख हा आम्ही तीन मित्रांनी संतोष, सागर आणि ज्ञानेश्वर २२ एप्रिल ते २८ एप्रिल २०१६ दरम्यान लातूर जिल्ह्यातील सोनावती गावात झालेल्या श्रमसंस्कार शिबिराची व त्याजवळील दुष्काळाची दृश स्वरूपात मांडणी करण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचसोबत पुढील ४ दिवसांचा लातूर ते पुणे सायकलीने केलेला प्रवास, ज्यात वैभव, हा चौथा मित्रही जोडला गेला, त्या प्रवासाचे वर्णनही ह्या लेखामध्ये लिहलेला आहे.
Sonawati Dam during the Rainy Season |
-----
दुष्काळ, ज्याला वेगवेगळी नाव दिली जातात. प्रत्येकजण आपल्या मानसिक अभिक्षमतेचा कस लावून त्याला आपल्या व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न करतो. काही म्हणतात की, दुष्काळ म्हणजे निसर्गाचा कोप; तर काही म्हणतात मानवाने स्वतः ओडवुन घेतलेल नैसर्गिक संकट. दोन्हीही मतांची व्याप्ती तपासत, नुसती त्याची वरवर चर्चा करणं. शहरात, सकाळी संडासाचा फ्लश, मोरीतला शौवर आणि नंतर वाटरपार्कमध्ये खिदाखिदा आनंद घेऊन तोंडावर पडत गंभीर; निरर्थक चर्चा करनं. एवढ्यापुरंत मर्यादित राहण्यापेक्षा, प्रत्यक्ष त्या प्रदेशात जाऊन काही रचनात्मक काम करु. काही दिवस गमती जमातीचा प्रवास करुन लोकांची मते, भूमिका, जाणिवा, संवेदना जाणून घेवू या उद्देशाने आम्ही २२ एप्रिल २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील सोनावती गाव या ठिकाणी जाण्याचे ठरवलं.
सोनावती गावामध्ये आमची ओळख 'स्वराज अभियान' या संघटनेसोबत झाली. मागील काही वर्षांपासून स्वराज अभियान सोनावती आणि आसपासच्या काही गावांमध्ये "पाणी वाचवा, पाणी जिरवा" सारख्या कार्यक्रमांनी जनजागृती करत आहे. याविषयी अधिक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये मिळू शकेल. आम्हाला या संघटनेतील लोकांशी बोलून आणि काम करत असताना नवनवीन गोष्टी कळल्या. संघटनेच्या मते, शेतकऱ्याचे ज्या काही सामाजिक-राजकीय -सरंजांमदार आणि भांडवलदार वर्गाने शोषण केले आहे. त्या शोषणाची आवश्यक ती खरी परतफेड एकच ठरू शकते, ती म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून स्वतः राजकीय सहभाग घ्यावा व आपली भूमिका शासन व्यवस्थेला पटवुन द्यावी. स्वतःसाठीचा न्याय स्वतःच मिळवून घ्यावा. राजकीय अविश्वासातून निर्माण झालेली अपरिहार्यता का होईना पण ही आजची एक मूलभूत गरजही बनली आहे. खूप चर्चा झाल्या. चळवाळीचा पाया जर खरा, पारदर्शक, शाश्वत आणि पुरोगामी असला तर तिचे अस्तित्व टिकणे शाश्वत आहे, असा निष्कर्ष शिबिराच्या चर्चांमध्ये काढला गेला .
आजच्या शेतीसाठी सगळ्यात महत्वाच म्हणून संदीपान बडगिरे एक शेतकरी कार्यकर्ते बोलले की,
"लोकांनी सेंद्रिय शेती करण्यात रस घेतला पाहिजे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून पाण्याचे काटेकोर आणि योग्य उपाययोजन केले पाहिजे. उस, कापूस, मका सारखे अतिपाणी खर्चीक पिक न घेता; ज्वारी, बाजारी, कडधान्या सारख्या कमी पाणी लागणाऱ्या आणि प्रत्यक्ष घरात उपभोगीय असणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे."दिनांक २३ एप्रिल ते २८ एप्रिल अशी पाच दिवस हे साहसी श्रमसंस्कार शिबिर चाललं. ज्यामधे आम्ही मित्र गावकऱ्यांसोबत सहभागी झालो. ५ दिवसांमधे आम्ही सरासरी १५ ते २० लोकांनी मिळून १५×३ फुट लांबी×रुंदीचे दोन बंधारे गाव शेजारील नाल्यावर बांधले.
-----
'दुष्काळ' या आपत्तीचं वेगळेपण हे आहे की ह्या आपत्तीची चाहुल खुप आधीच लागून जाते. ती पूर, भूकंप इत्यादी आपत्तीसारखी अचानक येत नाही. म्हणून त्यावर उपाययोजना देखील अधिक परिणामकारकपणे केली जावू शकते. कारण इतर आपत्तींपेक्षा यामधे वेळ खुप जास्त मिळतो. मात्र आपल्या राजकीय व्यवस्थेचा (प्रतिनिधींचा) रस हा भांडवली जगामधे जास्त गुंतला असल्या कारणाने त्यांचे दुष्काळाकड़े दुर्लक्ष्य होतांना दिसते. म्हणजे जरी महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये (बुंदेलखंड प्रांत) दुष्काळजन्य परिस्तिथी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे; हे ऑगस्ट २०१५ मध्येच सिध्द झाले असले तरी त्याच्या उपाययोजनेवर चर्चा आयपीएल सारख्या मुद्द्यानंतर म्हणजे मार्च २०१६ पासून प्रसारमाध्यामात झळकायला सुरुवात होते ही खरी शोकांतिका आहे.
लातूर मधल्या अतितीव्र दुष्काळी भागाचीही हीच परिस्थिती आहे. म्हणजे मागील तीन महिन्यांपर्यन्त विविध बडे औद्योगिक आणि साखर कारखाने चालु होते. ज्याची नाळ ही राजकारण आणि अर्थकारणाशी जुळलेली आहेत. तीच राजकारणी माणसे आता दुष्काळी भागात विकासाच्या कामांची आश्वासन देत आहेत. याचा फ़ायदा कोणाला आणि कश्या पद्धतीने होईल याबद्दल अजूनही पारदर्शकता नसतांना 'उस लागवड हे दुष्काळाचे कारण नाही' असा दावा इथली सत्तास्थान मात्र करतांना दिसतात असा आशय मला या शिबिराचे आयोजक संदीपान बडगिरे व इतर शिबिरार्थिंशी केलेल्या चर्चेतून जाणवला.
संदीपान बडगिरे हे तेथील स्थानिक शेतकरी आहेत. ३० पेक्षा जास्त वर्षे त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचा सेंद्रिय शेतीवर विशेष अभ्यास आहे. त्यांनी फक्त दुष्काळातील समस्यांची मांडणी न करता उपाययोजनांची कल्पना देखील दिली. त्यांच्या मते आजच्या दुष्काळाला योग्य पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घेतली जावी. शेतकऱ्यांना बजारपेठेच्या गुलामीतुन सुटका मिळवण्यासाठी नगदी पिकांऐवजी घरी ज्यांचा उपभोग रोजच्या वापरात करता येऊ शकतो उदा. तृणधान्य आणि कडधान्य आणि जी जास्त दिवस साठवुन ठेवता येऊ शकतात अशी पिके घेतली तर दुष्काळाला शेतकरी तोंड देवू शकतो आणि पूर्वस्थिती निर्मीतीस अनुकूलता निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
शिबिरातील श्रमदानाचे महत्व -
श्रमदान हे शक्तीसाधन असलेल्या माणसाने गरज असलेल्या माणसाच्या समस्या निवारणासाठी करायचे असते. दुष्काळातील शेतकऱ्यांना कश्या प्रकारे मदत करावी हा प्रत्येकाच्या जरी स्वयंनिर्णयाचा मुद्दा असला तरी त्याची उपयोजितता आणि शाश्वतता प्रत्येकाने नीट तपासली पाहिजे. एखादे रचनात्मक काम करणे ज्यातुन समस्येचे कमी क्षेत्रात पण शाश्वत निवारण होईल अश्या कामांमधे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होणे हाच तर शेतकऱ्यांच्या जखमांना परिणामकारक मलम असू शकतो. म्हणूनच कि काय शिबिरात सिमेंटचे बंधारे बांधणे हा मुख्य हेतु होता.
सोनावती गावाच्या बाजूला असलेल्या एका पठारावरुन एक नाला वाहत गावाच्या बाजूने येवून पुढे मांजरा नदीला मिळतो. मागच्या काही वर्षांपासून येथे ऊस लागवड मोठया प्रमाणात होत होती. त्याचा परिणाम हा तेथील जमिनीतल्या भुजलाचे प्रमाण कमी होण्यात झाला. शेतकऱ्यांच्या ५०० फुटांपेक्षा जास्त खोल असलेल्या कृत्रिम कुंपनालिका आता कोरडया पडलेल्या आहेत. म्हणजेच पूर्वी गावातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी ऊस लावत होते. मात्र आजच्या परिस्तिथीत तेथे अश्या शेतकऱ्यांचे प्रमाण हे हातातील बोटांच्या संख्येपेक्षा कमी झालेले आहे. म्हणून भुजलाची पातळी वाढावी यासाठी पाणी थांबवणे आणि त्याला जिरवणे, जेणे करून आधी पृथ्वीची तहान भागवणे ही प्राथमिक जबाबदारी म्हणून मानली गेली पाहिजे.
वाहून जाणारे पाणी जमिनीत जीरल्यास त्याची साठवण पृथ्वीत चांगली राहु शकते. म्हणजे कमी पाऊस जरी झाला तरी पाणी जमिनीत साठून रहावे हा त्यामागील हेतु आहे . मात्र उपाय सुचवताना तेथील भौगोलिक वातावरणाचा अभ्यास, लोकसंमती आणि लोकसहभाग इत्यादी पूर्वतयारी असायला हवी. जी या शिबिरामधे पाळली गेली. अडवलेल्या पाण्याचा प्रत्यक्ष पंपाने वापर न करता पाणी केवळ जीरावण्यासच असू द्यावे यावर लोकांची सहमती घेतली गेली होती हे महत्वाचे. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रिय शेती करण्याचेही ठरवलेले आहे. ज्वारी, तुर सारख्या पिकांची लागवड केल्याने पाण्याची बचत होईल आणि शास्त्रीय पद्धतीने जर सेंद्रिय शेती केली तर कमी खर्चात जास्त आणि उपयोगी, आरोग्यदायी अन्नपदार्थ उत्पादित होतील असा यमागचा उद्देश्य आहे .
शेतकऱ्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्काची मागणी येथील स्वराज अभियान वेळोवेळी करते. ज्यामधे गावातील १४ शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सदस्य म्हणून सहभाग आहे. श्रमदानाची वेळ रोज किमान ५-६ तास होती. त्याचसोबत दररोज दुपारनंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. शिबिरार्थिंचे श्रमाविषयीची जाणीव सोबतच सामाजिक भानही वाढ़ावे म्हणून समकालीन परिस्थितिशी संबंधित विषयांवर संवाद होत होते . त्यातही महत्वाचे म्हणजे अंधश्रद्धा आणि बुवाबाजी, स्त्री-पुरुष समानता, पाणी प्रश्न, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, धर्माचे राजकारण, राष्ट्र्वाद अश्या विषयांवर वैचारिक चर्चा झडत होत्या.
सर्व चर्चा विवेकवादाच्या कसोटीवरच होत होत्या, म्हणजे स्त्री म्हणजे फक्त प्रजोत्पादन करणारे मशिन नसून तिही माणूस या प्रजातीमध्येच मोडते. तिच्यावरिल अन्यायाची सुरुवात स्त्रीभ्रूण हत्येपासून ते तिच्या अस्तित्वाच्या ओळखीपर्यंत देखील संपतांना दिसत नाही. आधुनिकतेच्या मानवतावादात स्त्रीचे स्थान कुठे असावे याचे समाजाकडून उत्तर मागण्याची सुरवात झाली पाहिजे.
सर्व चर्चा विवेकवादाच्या कसोटीवरच होत होत्या, म्हणजे स्त्री म्हणजे फक्त प्रजोत्पादन करणारे मशिन नसून तिही माणूस या प्रजातीमध्येच मोडते. तिच्यावरिल अन्यायाची सुरुवात स्त्रीभ्रूण हत्येपासून ते तिच्या अस्तित्वाच्या ओळखीपर्यंत देखील संपतांना दिसत नाही. आधुनिकतेच्या मानवतावादात स्त्रीचे स्थान कुठे असावे याचे समाजाकडून उत्तर मागण्याची सुरवात झाली पाहिजे.
पाणी ही नैसार्गिक संपती आहे आणि त्याच्या वापरात कुठलाही दोष आढळत असेल तर तो मुलभुत/नैसर्गिक हक्काच्या भंगाएवढ़ाच दंडनीय आहे. असंघटित कामगारांची घुसमट आणि वाढता फसिस्टवाद या प्रश्नांची तीव्रता या चर्चामधुन कळाली. विशेष म्हणजे या चर्चेला गावातील लोक आणि शिबिरार्थी अशे सगळे बसतात, यामधे एखाद्या संकल्पनेला अधिक सोपे करूण सांगण्याचे कौशल्य शिकायला मिळाले.
दुपारी शिबिराच्या समारोपात अनेकांनी आपले विचार मांडले. ज्यामधे प्रत्येकाचा सांगण्याचा कल हा दुष्काळाच्या परिस्थितीशी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, व्यावहारिक, आणि नैतिक उपाययोजनांच्या आधारे कसे लढता येऊ शकते यावर होता. संस्थात्मक पातळीवर प्रयत्न तर असावेत तेहि जास्तीत जास्त पारदर्शकच पण त्याने मोठे ध्येय साध्य होत नाही. म्हणून त्याच्यासोबतच लोकांचा रचनात्मक कामात श्रमाच्या रुपात सहभाग आणि राजकीय सहभाग देखील तेवढाच महत्वाचा आहे असे संबोधित झाले.
दुष्काळ देखील जात, धर्म, वर्ग यानुसार वेगवेगळया परिमाणांतून पडताळता येऊ शकतो. म्हणजेच पाण्याचे टॅंकर हे देखील गावकुसातल्या वस्तीचे स्वरुप बघुन फिरतात. मुळात संसाधानांची मालकी आणि सामजिक प्रतिष्ठा दुष्काळाच्या तिव्रतेचे जास्त शोषित-केंद्रित घटक कोण आहेत ते ठरवतात. म्हणजेच प्रतिष्ठीत घटकांना दुष्काळाची झळ इतर बहुसंख्याकांपेक्षा कमी बसते. नदी, विहिरि, सार्वजनिक पाणवठे आटले तर पाणी विकत घेण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात आणि रोजगाराची अडचण हे आजचे वास्तव आहे. म्हणून दुष्काळावर उपाय हा सर्वांगाने विचार करुन केला गेला तरच ह्या संकटावर मात केलेली शाश्वत समजली जाऊ शकते.
~ ज्ञानेश